•mr•

झोपायची वेळ झाली!

आपण परीक्षा न देताच मागच्या दारानं उत्तीर्ण झाल्याचा न्यूनगंड एवढा असावा की बाकीच्यांनीही परीक्षा देऊ नये असा फतवा काढावा! ये ऐसी कैसी सुबह हो गयी मामु ?

आपण परीक्षा न देताच मागच्या दारानं उत्तीर्ण झाल्याचा न्यूनगंड एवढा असावा की बाकीच्यांनीही परीक्षा देऊ नये असा फतवा काढावा! ये ऐसी कैसी सुबह हो गयी मामु ?

बाकी परीक्षा घेणं आणि अभ्यास करून ती देणं हे सायन्स आहे. ती रद्द करायला अंगात ना ना कला असाव्या लागतात हे खरं.

उद्या कोरोना बॅच मधल्या मुलांना नोकरी नाही देणार असा फतवा कंपन्यांनी काढला तर काय करावं? एमएससाठी परदेशातल्या विद्यापीठांनी आडकाठी केली तर काय करावं?

मला वाटतं, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, नक्की पडला असेल नव्हे, पडला असेलच- मी तर म्हणतो पडायलाच हवा असा प्रश्न; पण त्या प्रश्नाला तुमची काही पडली आहे का? नाही ना? असंच असतं आयुष्य.

त्यामुळे असले महत्वाचे प्रश्न तुमच्याकडंच ठेवा, उगा विचारुन राजकारण करू नका.

आणि हो, आता पावसाळा सुरू होईल. पाऊस पडतो पावसाळ्यात, पावसात पाणी असतं, पण म्हणून ते पाणी प्यायचं नाही लगेच, गार असतं ते. पाणी कोमट करून प्यायचं. मी पिणार आहे, तुम्ही पण प्या.

बाकी, हा महाराष्ट्र..

- सौरभ राघवेंद्र

(या काही ओळी जर विनोदी वाटत असतील तर ते श्रेय संपूर्णपणे या ओळींमध्ये रेखाटलेल्या पात्रचं आहे, नसतील तर तो दोष माझा. बाकी फक्त रिमोट कंट्रोल वापरायची इच्छा असताना लोकांनी थेट टीव्ही मध्ये नेऊन ठेवलेल्या या सद्गृहस्थासाठी मला मनापासून वाईट वाटतं. संगत चुकली हो बिचाऱ्याची, बाकी काही नाही. बाकी मला कोणी बंगल्यावर बोलावू नये, अनोळखी लोकांनी बोलावल्यावर जाऊ नये असं आई सांगते.)

ता.क.

आजचं लाईव्ह सेशन पाहिलं. मी लहान असताना दूरदर्शनवर बातम्या पाहत असे, त्यांची आठवण झाली-

एअरफोर्स, आर्मी आणि नेव्ही सज्ज आहे, एनडीआरएफ च्या तुकड्या तैनात आहेत. मोदी-शहांनी पूर्ण मदतीचा विश्वास दिलाय. वस्तू बांधून ठेवा, औषध वेळेवर घ्या. वादळ परतून जावं म्हणून प्रार्थना केलीये. आजचं बातमीपत्र आता संपलं, तुम्ही घरी सुरक्षित रहा (मी घरीच आहे!)

यातला विनोदाचा भाग आता सोडू.

यात शंका आजिबातच नाही की काही रिलीफ बजेटचा वीस लाख कोटींचा आकडा ऐकून नवी ऊर्जा संचारलेल्या लकाकलेल्या डोळ्यांचे काही जाणते अपवाद सोडले तर सगळेच आपापल्या परीनं या सगळ्याच संकटांचा सामना करत आहेत; पण नेतृत्त्व करण्यासाठी जो आत्मविश्वास असायला हवा, नसला तरी दिसायला हवा, त्याचा संपूर्ण अभाव होता आज शिवाय आवेशपूर्ण भाषण केलं नाही तरी, "पुरे रे केशवा, बास रे माधवा! सोसवत नाही आताशा. आता मी फक्त प्रार्थना करू शकतो रे, बाकी वादळ फिरलं तर फिरलं" हे असलं बोलणं?

सर्वसामान्य माणूस म्हणून ही बडबड शोभेलही कदाचित पण जगभरातले कुटाणे करून जी खुर्ची मिळवली त्याच खुर्चीत असं गलितगात्र होऊन बसणं अभिमानास्पद तर जाऊच दे, आशादायीसुद्धा नाही.

मान्य आहे की हे सरकार अंतर्गत विरोध आणि विरोधाभासांनी काठोकाठ भरलेलं असताना त्याचं नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट अजिबातच नाही, पण शौर्याचा आव आणायचाच म्हणून प्रत्येकवेळी फुगवून फुगवून छाती शेवटी फुटायचीच की! शिवाय आता तर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुका होईपर्यंतच ते काय या सरकारचं आयुष्य आहे असं भाकित काही सूज्ञ जाणकार वर्तवत आहेतच, पण त्याच्याच सोबतीनं आपलं सरकार मुळातच तिरपागडं आहे या न्यूनगंडातुन सुरू झालेलं ट्रोलिंग अचानकच कमी होणं, अनेक मान्यवर पत्रकारांचा नूर रातोरात पलटणं, पक्षभेद चव्हाट्यावर येऊ लागणं ही या भाकिताच्या खरं ठरण्याच्या प्रक्रियेची नांदी तर नव्हे अशी शंका उपस्थित होत आहे.

धृतराष्ट्राला युध्दस्थितीचं कथन करणारा महाभारतातला संजय युद्ध आणि युद्धातलं राजकारण या दोहोंपासून अलिप्त होता. आता बसल्या बसल्या मी युद्धवार्ता देतोच आहे तर जाता जाता मी या युद्धाचा शिल्पकारही का होऊ नये या जाणिवेने तो ग्रासला गेल्याचा पुरावा माझ्या तरी वाचनात कुठेच आलेला नाही, पण सद्य भारतातल्या 'महा' आघाडीच्या पाचवीला पुजलेला आणि रोज उठून उवाच मधल्या 'वा' चा 'गा' करणारा संजय मात्र फुकाच्या अहंकारानं ग्रासतो काय, या अहंकारापोटी भद्राचं अभद्र करतो काय आणि या प्रक्रियेत महाराष्ट्रातल्या जनतेला दावणीला बांधतो काय! या वर्षी भाकितं केलेल्या आकल्पितातलं माझ्यासाठी हे ही एक आकल्पितच आहे.

भीमा-कोरेगावच्या हिंसाचाराचा खटला वर्ग करताना (किंबहुना त्याआधीच कदाचित) पडलेलल्या ठिणगीची आग आता लागलीये कुणाच्या बुडाला, त्याची झळ बसतेय कोणाला आणि इतक्या कसोशीनं दाबलेला धूर बाहेर पडतोय कधी, याची वाट पाहणं इतकंच माझ्या हातात राहिलं आहे असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटतंय.

हे वाटणं जरी खरं असलं तरी ज्या लोकांमुळं मला हे असं वाटतं तीही शेवटी माणसंच आहेत. आणि माणूस म्हटलं की जन्मतः कोणीच कमकुवत किंवा कणखर नसतं, परिस्थितीला सामोरं जाणंही सगळ्यांनाच जमतं असं नाही शिवाय कोणी स्वभावात: वाईटही नसतं; पण सार्वजनिक आयुष्यात वावरताना आपली स्वप्नं आणि आपली कुवत यांच्यातली तफावत विचारात घेतली नाही तर काय अनर्थ होऊ शकतो याची अनेक उदाहरणं ज्या इतिहासाचे दाखले ही मंडळी देतात, त्याच इतिहासात नमूद झालेली आहेत. आता यांचे दृष्टीदोष दूर होतील अशीही प्रार्थना करणं ही आपली जबाबदारी.

हा सामाजिक गोंधळ एकीकडे ठेवला तरी आता या सर्व परिस्थितीमध्ये आता माझाही खूप गोंधळ होऊ लागलाय आणि या गोंधळाचं स्वरूप थेट प्रतिमेच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचतंय. जंगलाला लागणाऱ्या आगी, टोळधाड, वादळं, अभूतपूर्व चक्रीवादळं, कोरोना सारखी महामारी, कोरोना सारतोय तोच अपॉकेलिक्टिक व्हायरसची भविष्यवाणी, बदलत जाणारी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजनैतिक आणि सामरिक समीकरणं, ढासळत जाणारी अर्थव्यवस्था, हिशोब चुकलेली वैयक्तिक अर्थगणितं, रस्तोरस्ती फिरणारे असहाय्य मजुरांचे तांडे, याही स्थितीत यत्किंचितही स्थितीगांभीर्य नसलेले एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानणारे बुद्धिवादी, धूळ झाडताना शिंक आली तरी चाटून जाणारी भिती याअसल्या सगळ्या गोष्टींकडं पहावं, तर पहावं तरी कसं हेच मूळात उमजत नाही आता मला.

माझ्या मराठी असण्याचा, ब्राह्मण असण्याचा, भारतीय असण्याचा, ग्लोबल सिटीझन असण्याचा, उजवं-डावं किंवा काळं-गोरं असण्याचा, टीचभर अकला असणाऱ्या लोकांकडून 'तुम्ही लोक प्रिव्हिलेज्ड आहात' असं सांगून ते कसं हे सांगताना बौद्धिक मैथुनाचे तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करून त्यांनी आमच्यावर उडवलेल्या शब्दवीर्याचा, आम्हीच रचलेल्या समाजरचनेमध्ये आम्ही वेगळे कसे आहोत हे सांगणाऱ्या अहंकारातुन निर्माण होणाऱ्या वादातल्या माझ्या नेमक्या बाजूचा, माझ्या राजकीय कलाचा, अभिनिवेशाचा, माझ्या नोकरीचा, ती असण्याचा किंवा नसण्याचा- यातल्या एकाही, एकाही गोष्टीचा ह्या संकटाचा सामना करून ते सोडवण्यासाठी थोडासा तरी उपयोग आहे का?

निसर्गापासून फारकत घेत घेत आपण त्याच्यापासून आता इतकं लांब आलोय का की आपल्या दाराशी येऊन कोसळणाऱ्या पावसातून, कडाडून भोवताल दणाणून सोडणाऱ्या वीजांतून, पेटलेल्या जंगलांतून, विष-विषाणूंमधून, "तुमचे विचार, तुमचे इमले, तुमच्या कल्पना, तुमचे आडाखे, तुमची परस्परविरोधी तत्त्व, त्या तत्त्वांना तुम्ही मानणं, त्यांच्यानुसार चालणं, मी मानतो- मी चालतो हा अहंकार बाळगणं हे धडधतीत असत्य आहे. तुम्ही आहात हा विचारच मुळात तुमचा भ्रम आहे, आणि या विचारातून उभं केलेलं तुमचं आयुष्य, कुटुंब, समाज, शिक्षण, विश्व, हे सगळं सगळं, सगळं पोकळ कल्पनांच्या डोलाऱ्यावर उभं आहे आणि मी वास्तवाचा, सत्याचा एक तडाखा दिला की पत्त्याच्या बंगल्यासारखं हे सगळं धडाधड कोसळून जाईल!!" अशी चिथावणी निसर्ग आपल्याला देतोय आणि आपण मात्र त्याच्याच छाताडावर उभं राहून आम्ही अमक्यांचे वंशज, तमुक आमचे पूर्वज असं सांगत मर्दमुकी गाजवण्याच्या गमजा करतोय, स्वप्नं पाहतोय, याला म्हणावं तरी काय

भारतीय भूखंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेलं हे वादळ अक्षरशः प्रत्येकाच्याच मेंदूत उठायला हवं अशी माझी मनोमन इच्छा आहे, असं झालं नाही तर जिवंत असूनही मृत विचारांचा आधार घेऊन आधीच मृतवत झालेला आपला समाज त्याच्या हयातीत कधी खडबडून जागा होणारच नाही असं वाटून माझं मन हळहळलं तर त्यात गैर काहीच नसावं असं मला वाटतं.

असो. झोपायची वेळ झाली!

- सौरभ राघवेंद्र.